शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

तंबाखू , खर्रा , गुटखा , धुम्रपान ..ई सोडण्यासाठी !


मला वयाच्या १६ व्या वर्षापासून..कुतूहल..अनुकरण वगैरे कारणांनी धूम्रपानाची सवय लागली होती ..हळू हळू त्या सवयीचे व्यसनात रुपांतर झाले ..मग प्रत्येक वेळी काही खाल्ल्यावर ..चहा प्यायल्यावर ..कंटाळा आला म्हणून ..बोअर झालो म्हणून ..टेन्शन आहे...डोक्याला शांतता म्हणून ..झोपण्यापूर्वी .सकाळी उठल्याबरोबर ..असे ते व्यसन सुरूच राहिले ..त्या नंतर मी दारू ..चरस ..गांजा ..ताडी ..भांग व शेवटी ब्राऊनशुगर अशा गंभीर व्यसनांकडे देखील ओढला गेलो ..त्या सगळ्यात आयुष्याची सुमारे २५ मौल्यवान वर्षे वाया गेल्यानंतर मी वयाच्या ४० व्या वर्षी ईश्वराच्या कृपेने...तसेच मुक्तांगण ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस ..व इतर व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेवून दारू पासून इतर सगळी व्यसने सोडली . मात्र तरीही गेली दहा वर्षे धूम्रपानाचे व्यसन काही सुटत नव्हते ..मी देखील ते सुटण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करत नव्हतो ..शेवटी मनाचा हिय्या करून धुम्रपान देखील बंद करावे हे ठरवले ..काय त्रास होईल तो सहन करू असा मनाचा निर्धार केला ..स्वताच्या मानसिक शक्तीवर केलेले दोन तीन प्रयत्न विफल झाले ..काही दिवसातच पुन्हा धुम्रपान सुरु होऊ लागले ..शेवटी औषधांची मदत घ्यावी हे ठरवले ..त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या निकोरेट / निकोटेक्स / निकोगम या निकोटीन युक्त च्युइंगमची आणि प्राणायामाची मदत घेण्याचे ठरवून सुरवात केली ..पाहता पाहता त्याला आता एक महिना होऊन गेला ..मी धूम्रपानापासून दूर आहे ..शारीरिक अवलंबित्व संपलेय ..मानसिक अवलंबित्व अजून पूर्ण गेले नाही ..तरीही या पुढे काहीही झाले तरी एकदाही धुम्रपान करायचे नाही हा निश्चय केला आहे ..तो पाळता येतोय सहजपणे ! काल मी धुम्रपान सोडल्या नंतर मला जाणवणारे फायदे शेअर केले होते ..अनेक मित्रांनी त्यांना देखील तंबाखू अथवा इतर तंबाखूजन्य व्यसने बंद करायची आहेत ..त्या साठी मार्गदर्शन करावे अशी विचारणा केली ..म्हणून त्यांच्या साठी खालील सूचना देत आहे ! या सूचनांच्या मदतीने नक्की त्यांना व्यसनमुक्त होता येईल अशी आशा आहे !
सूचना !
१ ) माझे व्यसन फारसे गंभीर नाही ..मी दिवसातून एकदोन वेळाच व्यसन करतो..असे ज्यांना वाटते त्यांना या सूचनांचा फायदा कितपत होईल या बाबत शंकाच आहे ..सर्व प्रथम मी जरी कमी प्रमाणात व्यसन करीत असलो तरीही..ते देखील भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकते ..मला कॅन्सर सारख्या निर्दय व जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागू शकते हे स्वता:शी ठरवले पाहिजे मगच प्रयत्न गंभीरपणे करता येतात . थोडे थोडे करून बंद करू असा विचार करणार्यांनी तो विचार सोडून द्यावा ..कोणतेही व्यसन असे थोडे थोडे करून बंद करता येत नाही .
२ ) आपण हे व्यसन कोणावर उपकार म्हणून अथवा बायकोच्या किवा कुटुंबियांच्या आग्रहावरून सोडत आहोत असा अविर्भाव अजिबात नको ..आपण स्वतःच्या फायद्यासाठी हे व्यसन सोडत आहोत ही मनाशी खुणगाठ ठेवा .
३ ) आपण व्यसन सोडले तरी आपल्या आसपास व्यसन करणारे अनेक लोक असतील.. जे कदाचित आपल्याला आग्रह करू शकतात एखाद्या वेळी घ्या असा ..त्यांना नम्रपणे नकार देण्याची मानसिक ताकद बाळगा .
४ ) प्रत्यक्ष व्यसन बंद करायला सुरवात करताना मेडिकल स्टोर्स मध्ये तंबाखूजन्य व्यसने सोडण्यासाठी कमी प्रमाणात निकोटीन असलेले च्युइंगम मिळतात ..ते विकत घेवून ठेवा..वेगवेगळ्या कंपन्यांचे च्युइंगम बाजारात उपलब्ध आहेत ..निकोरेट ..निकोटेक्स..निकोगम या कंपन्या मला माहित आहेत ..त्या पैकी हे च्युइंगम २ मिलीग्राम व ४ मिलीग्राम.. अशा दोन प्रकारात उपलब्ध आहेत ..जास्त प्रमाणात व्यसन असलेल्या लोकांनी ४ मिलीग्राम चे तर कमी प्रमाण असलेल्या लोकांनी २ मिलीग्रामचे च्युइंगम वापरावे ..तंबाखू अथवा धूम्रपानाची आठवण झाल्यावर हे च्युइंगम तोंडात ठेवून चघळावे..त्यामुळे शारीरिक त्रास कमी होतो ..अस्वस्थता ..हुरहूर ..काहीतरी बिघडले आहे असे वाटणे बंद होते ..एका च्युइंगम चा परिणाम सुमारे चार तास टिकतो ..
५ ) मानसिक त्रास कमी होण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा कपालभाती ..भस्त्रिका .अनुलोम विलोम हे प्राणायाम करावेत ..त्यामुळे मानसिक शांती टिकवण्यास मदत मिळते ..चिडचिड होत नाही ..डोके सुरळीत काम करते .
६ ) वरील सूचनांचा उपयोग करून आपल्याला सहजगत्या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन बंद करता येते ..च्युइंगम किती दिवस घ्यावेत या बाबतच्या सूचना त्या च्युइंगमच्या पाकिटात असलेल्या कागदावर लिहिलेल्या आढळतील त्या वाचा . हे च्युइंगम चघळणे देखील हळू हळू कमी करत जावे .व नंतर काही दिवसांनी पूर्ण बंद करावे .
७) काही लोकांना अपचन ..गॅसेस असा त्रास होऊ शकतो मात्र तो त्रास नगण्य आहे ..तसेच ज्यांना खूप कफ झाला असेल पूर्वीच्या सेवनाने त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने एखादे कफ सिरप काही काळ घेण्यास हरकत नाही ..काही लोकांना झोप सुरळीत होत नाहीय असे वाटेल ..मात्र त्या कडे लक्ष न देता आपला चांगला उपक्रम सुरूच ठेवा ..सुमारे महिन्याभरातच सगळे सुरळीत ..व्यवस्थित होते .
८ ) च्युइंगम अथवा प्राणायाम यांची मदत न घेता देखील केवळ मानसिक मानसिक शक्तीच्या बळावर काही जणांना हे जमू शकेल ..प्रत्येकाने आपल्याला काय सोयीस्कर आहे हे ठरवावे .
९ ) सुमारे आठ दिवसातच आपणास व्यसन बंद केल्याचे फायदे निदर्शनास येतील ...ते फायदे वारंवार मनात आठवावे म्हणजे पुन्हा व्यसन सुरु होण्याचा धोका कमी होतो .
१० ) एकदा व्यसन बंद झाल्यावर पुन्हा कधीही ..कोणत्याही कारणाने ते सुरु करणार नाही असे स्वतःला बजावत रहा..व त्याचे पालन करा ...म्हणजे आपले व्यसन कायमचे बंद राहण्यास मानसिक ताकद मिळेल .
मी जे केले ते येथे नमूद केले आहे ..काही लोकांना अन्य मार्ग माहित असतील त्यांचा देखील वापर करण्यास हरकत नाही . व्यसन बंद करणे महत्वाचे आहे ..लक्षात ठेवा व्यसन मुक्त जीवन खूप सुंदर आहे ..आपल्या सगळ्या शारीरिक व मानसिक क्षमता त्यामुळे वापरता येतात ..दिवसभर उत्साही वाटते ..कार्यक्षमता वाढते ..आरोग्यपूर्ण जीवन ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे ...
या सोबतच योगाभ्यास व प्रमाणाम करीत राहिले तर आपल्या क्षमता वाढवता येतात ..व यशाची नवनवीन शिखरे आपल्याल सर करता येतात . येणाऱ्या नवीन वर्षासाठी हा व्यसनमुक्तीचा आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा संकल्प करा !
ही माहिती शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व या व्यसनमुक्तीच्या चळवळीस हातभार लावा !
सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

लैंगीक अत्याचारा बाबत महत्वाचे निरीक्षण व संभाव्य उपाय !


1) सामुहिक बलात्कारात सामील असलेले बहुतेक जण बहूधा दारू प्यायलेले अथवा इतर कुठल्या तरी मादक द्रव्याच्या अंमला खाली असतात..तेव्हाच ते इतका भीषण अपराध करू शकतात किवा ते धर्माध असतात .
2 ) एकटयाने हा गुन्हा केलेले लोक बहुधा लैगीक उपासमारीने ( सेक्स स्टारव्हेशन ) ग्रस्त असतात ..त्यांच्या कडे रेड़लाइट एरियात जाण्याचे धैर्य नसते तसेच अनेक लैंगिक अंधविश्वास त्यामागे असु शकतात .
3) कुमारी म्हणजे अल्पवयीन किवा अनाघ्रात मुलीशी सहवास केल्यास एडस व गुप्तरोग बरा होतो असा एक भयंकर गैरसमज मी ऐकला आहे.
4 ) काही लोकांना बलात्काराची मानसिक विकृती असु शकते ..त्या मागे स्त्री बद्दलचा द्वेष किवा समस्त स्त्री जातीबद्दल राग असतो .
5 ) प्रत्येक बलात्कारीलाbआपले काही वाकडे होणार नाही असा अतीआत्मविश्वास असतो किवा ' कामातुरानां न भयं न लज्जा ' अशी गत असते ..
6 ) व्यक्तीगत बलात्काराच्या केसेस मध्ये बहुधा आरोपी स्त्री चा परीचित असतो.
संभाव्य उपाय !
1 ) फास्ट ट्रेक कोर्ट मध्ये अश्या केसेस चालवल्या जावून ..जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास ..संभाव्य गून्हे कमी होवू शकतील .
2 ) मुलींनी व स्त्रीयानी एखाद्या व्यक्तीवर अती विश्वास टाकु नये .
3 ) लग्नाच्या अथवा नोकरीच्या व इतर अमिषाने स्त्रीने शरीर संबंधास मान्यता देवू नये.
4 ) सेक्स स्टारव्हेशन असलेल्या कीवा लैन्गिक उपासमारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तिंसाठी हस्तमैथून हे एक वरदान आहे तेव्हा हस्तमैथूना बाबत असलेले गैरसमज दूर केले गेले पाहीजेत..त्या साठी सरकारने व सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला पाहीजे .
5 ) एड्स..कुमारीमाता..गुप्तरोग..बलात्कार..स्त्री भ्रुणहत्या..लैंगिक शोषण अश्या लैंगिकतेशी संबंधीत गुन्हे निर्मूलना साठी इयत्ता आठवी पासुन शास्त्रीय लैगीक शिक्षण दीलेच पाहीजे !
6 ) व्यसनमुक्तीचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार झाला पाहीजे !
.....तुषार नातू ! ( एक चिंतन )

रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

खोटी प्रतिष्ठा !काल एक पालक आमच्याकडे उपचारांसाठी दाखल केलेल्या त्यांच्या मुलाला भेटायला आले होते...त्या मुलाला बाहेर एका महत्वाच्या कामासाठी न्यायचे होते ,,दोन तास बाहेर जावून तो परत येणार होता उपचारांना ..( महत्वाचे काम असेल तर असे गेट पास वर काही काळ बाहेर जाता येते उपचार घेत असताना ) बहुधा पालकांसोबत बाहेर आम्ही सोडत नाही अश्या वेळी .कारण तो उपचारी मित्र पालकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करून केंद्रात परत येणे टाळतो ..म्हणून त्याला बाहेर कामासाठी नेवून आणण्याची जवाबदारी आम्ही आमच्या कार्यकर्त्यावरच सोपवतो ..काल त्याचे आईवडील आमच्या कार्यकर्त्याला त्याला बाहेर कामासाठी नेण्याबाबत सूचना देत असताना ..त्या उपचारी मित्राला म्हणाले .." बेटा..तू मैत्रीच्या इमारतीच्या बाहेर पडल्यावर तोंडाला रुमाल बांध..म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही .. तू येथे उपचार घेतो आहेस हे समजणार नाही कोणाला " हे ऐकून वाटले ..जर पालकच आपला माणूस ' व्यसनाधीनता या आजाराने ग्रस्त असून त्याला उपचार घेणे गरजेचे आहे व त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही हे स्वीकारत नसतील तर तो उपचार घेणारा मुलगा तरी कसे स्वीकारणार ? ..शिवाय आईवडील दोघेही प्राध्यापक आहेत ..मात्र आपला मुलगा सध्या नालायक असून त्याला उपचार देण्यात कोणताही कमीपणा नाही हे त्यांना कोण समजावणार ? आणि खोट्या प्रतिष्ठेपायी ते मुलाला किती दिवस पाठीशी घालणार ? गम्मत अशी की मुलगा बार मध्ये मात्र उजळ माथ्याने जातो ..आणि व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय हे मात्र त्यांना लपवावेसे वाटतेय !

मनात आले की हे पालक जर असेच त्या मुलाबाबत वागत राहिले ..त्याला गोंजारत राहिले तर काही काळानी मुलाला नव्हे ....तर त्या पालकांना तोंडाला रुमाल बांधून फिरण्याची वेळ तो मुलगा त्यांच्यावर आणेल यात शंकाच नाही !

बियरची बला !जास्तीत जास्त तरुणांनी बियर पिऊन ' झिंग ' अनुभवावी व सरकारला भरपूर महसूल मिळवून द्यावा म्हणून हल्ली सगळीकडे ' बियर शॉपी ' सुरु झाली आहे ..नुकतेच एका तरुणांच्या टोळक्याला हातात बियरचे टीन घेवून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवताना पहिले ..जेमतेम १५ ते १८ या वयोगटातील त्या टोळक्यात मुलीही होत्या ...

१ ) बियरने काही होत नाही ..बियर म्हणजे दारू नव्हे ..हा एक मोठ्ठा गैरसमज सध्या अनेक लोकांच्या मनात असल्याचे लक्षात येतेय ..अर्थात कोण्यातरी बियरबाज व्यक्तींनीच हा गैरसमज पसरविला आहे ..बियर मध्ये अल्कोहोल असते ..फक्त तुलनेत कमी प्रमाणात असते ..बहुतेक दारूड्यांची व्यसनी होण्याची सुरवात बियरनेच झाली आहे हे सत्य आहे .

२) बियर पिणे हे उगाचच सधनतेचे किवा अधिक पुढारलेले असल्याचे लक्षण आहे हा एक दुसरा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे.. त्यामुळे बियर पिणे हे जास्त सोफीस्टीकेटेड असल्याचे मानणारे अनेक महाभाग मला माहित आहेत ..हे महाभाग सर्रास घरी बियर घेवून येतात ..घरातल्या महिलांना देखील बियर ने काही होत नाही हे पटवून देत ..त्यांना देखील बियर घेण्यास भाग पाडतात .

३ ) उन्हाळ्यात बियर घेणे आरोग्यास चांगले असते असा देखील प्रसार झालेला असून ..अनेक जण उन्हाळ्यात ' चिल्ड बियर ' घेणे हे ज्यूस किवा सरबत घेण्यासारखे मानतात ..

४ ) सरकारशी साटेलोटे असलेल्या दारू उत्पादकांनीच बियर विक्रीचे लायसन मिळणे सहज सोपे करून ..जास्तीत जास्त बियर खपावी याची पुरेपूर दक्षता घेतली आहे .

५ ) एकदा का तुम्ही या बियर ची ' झिंग ' अनुभवलीत की मग दारू आणि इतर मादक पदार्थांच्या आहारी जाणे सोपे असते ...

Santosh Saraf -यांनी माहिती दिलीय ----अजून एक भयानक गैरसमज आहे की बियर प्यायल्याने मुतखडा निघून जातो म्हणून.
याविरुद्ध सत्य परिस्थिती अशी आहे की बियर प्यायल्याने मुतखडा होण्याचा अधिक संभव असतो. याला जबाबदार असतो तो बियर मधला ओक्झालेट. या ओक्झालेट मुळे किडनीमध्ये भरपूर घनता असलेले आणि तीक्ष्ण टोके असलेले कॅल्शियम ओक्झालेट चे स्फटिक तयार होतात. त्यांचे पुढे खडे बनून मनुष्याला भयंकर वेदना देतात. प्रसंगी किडनी खराब होऊन रुग्ण दगावू शकतो.
किडनी स्टोन होणार्या लोकांनी तर बियर अजिबात पिऊ नये.

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

आणि ..जिवन सुंदर झाले !


आपले जिवन सुंदर ..सुखी ..समाधानी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते ..प्रत्येकाची जिवन सुंदर व्हावे या साठी नेहमीच धडपड सुरु असते ..तसेच जीवनाच्या सुंदरते बद्दलची प्रत्येकाची व्याख्या देखील वेगवेगळी असू शकते ...बहुतेकांच्या जिवनाच्या सुंदरतेच्या व्याख्येत ...नेहमी आपल्या मनासारखे घडावे ..आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी ..आपल्याकडे भरपूर पैसा असावा ..समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा ..आपल्या कुटुंबात कोणतेही आजार ..कलह..भांडणे असू नयेत...इतकेच काय आपण दिसायला सुंदर ..देखणे ..असावे ..सर्वांनी आपली तारीफ करावी ..आपल्यावर कधीही कोणतेही संकट येवू नये ..असे सगळे समाविष्ट असते ...दुर्दैव असे की असे सर्वार्थाने सुंदर जिवन कोणालाच प्राप्त होत नाही ..म्हणून तर समर्थ रामदासांनी म्हंटले आहे ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ..विचारी मना तूच शोधूनी पाहे ' ..

माझ्या जिवनाच्या सुंदरतेच्या व्याख्येत असेच सगळे होते ..आणि मी सुखी होण्या ऐवजी अधिक अधिक दुखी: होत गेलो ..कारण मला सगळे माझ्या इच्छेप्रमाणे घडायला हवे हा अट्टाहास सोडता येत नव्हता ..अगदी माझी शरीरयष्टी ..माझे आईवडील ..माझी जात धर्म ..कुटुंबाची सांपत्तिक स्थिती ..सगळे माझ्या मनासारखे मिळाले पाहिजे असे वाटे ..इतकेच काय माझ्या सभोवतालची परिस्थिती नेहमी मला हवी तशी असावी ..माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला आवडेल ..रुचेल असे वर्तन करावे असे मला वाटे ..जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध घडे तेव्हा तेव्हा मी निराश ..उदास ..वैफल्यग्रस्त ..भीतीग्रस्त ..होई किवा मला आसपासच्या लोकांचा.. परिस्थितीचा .कधी कधी स्वतःचा प्रचंड राग येई ..माझ्यावर अन्याय होतोय असे वाटे किवा न्यूनगंड निर्माण होई .. याच्या उलट जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखे घडे तेव्हा तेव्हा मला इतका आनंद होई की तो आनंद उन्मादाच्या पातळीवर घेवून जाई मला ..मग मी स्वतःला खूप कर्तुत्ववान समजू लागे ..इतर लोक माझ्यापेक्षा खूप छोटे आहेत असे भासे ..मी इतरांवर अधिकार गाजवत असे ..त्याच्या भावनांची पर्वा न करता त्यांच्याशी तुसडेपणाने अथवा बेदरकारपणे वर्तन करत असे ..अश्या वेळी माझा अहंकार वाढलेला असे ..मीच प्रत्यक्ष कर्ता करविता आहे अश्या भ्रमात मी वावरत असे .म्हणजे " अहं ब्रह्मास्मी " अशी अवस्था निर्माण होऊन मी स्वैर वर्तन करू लागे ..

एकंदरीत मनाविरुद्ध घडले की निराशा...वैफल्य..दुख: अन्यायग्रस्त असल्याची भावना आणि मनासारखे घडले की ' माज ' अशी माझी स्थिती होई .याच भावनांच्या ओघात माझ्या आयुष्यात आधी सिगारेट .मग दारू ..गांजा ..चरस ..भांग .अफू ..ताडी ..ब्राऊन शुगर अश्या व्यसनांनी प्रवेश केला..या व्यसनांचे वैशिष्ट्य असे की यांचे सेवन केल्यावर तात्पुरते काही काळ मला माझ्या सर्व समस्या सुटल्या सारखे वाटे ..किवा सर्व समस्या मी चुटकी सरशी सोडवू शकतो असा आभास निर्माण होई ..तसेच या व्यसनांच्या अंमलाखाली असताना माझ्यात प्रचंड शक्तीचा संचार होत आहे असे वाटे ..मी कोणालाही घाबरत नाही ..मी कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देवू शकतो अशी असामान्य असल्याची भावना निर्माण होई ..अश्या अवस्थेत संगीत ..नृत्य ..चित्र ..अशा सर्व कलांचा मी उत्तम प्रशंसक होई ..माझ्यातील प्रतिभा .हुशारी ..कर्तुत्व जागृत झाल्यासारखे वाटे ..अतिशय तरल ..सूक्ष्म ..इतरांना न समजू शकणाऱ्या भावना माझ्या मनात निर्माण होऊन आपण सुखी असल्याचा आभास निर्माण होई ..झटपट मिळणारा हा आनंद ..कोणालाही भावेल असाच होता .. मी या आनंदाच्या शोधात ..वारंवार आनंदाची ही अवस्था मिळावी म्हणून मी पाहता पाहता या व्यसनांच्या आहारी गेलो ..त्यांचा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या गुलाम झालो ..मग सुरवातीला मिळणारी आनंदाची अवस्था मिळवण्यासाठी मला व्यसनांचे प्रमाण वाढवणे गरजेचे झाले ..सतत या नशेच्या अमलाखाली असावे असे वाटू लागले ..नशा उतरली की जीवनातले वास्तव मला सहन होत नसे.. म्हणून पुन्हा नशा करत गेलो ..आणि एका अध:पतनाचा प्रवास सुरु झाला ..आर्थिक .मानसिक ..शारीरिक ..कौटुंबिक ..सामाजिक आणि नैतिक पातळीवर अधिक अधिक घसरण होत गेली ..मला मेंटल हॉस्पिटल मध्ये रहावे लागले..फुटपाथवर झोपावे लागले ..अपमानित होत गेलो ..खोटे बोलणे ..घरात ..घराबाहेर व्यसनांसाठी चोऱ्या करणे ..भांडणे ...शिवीगाळ ..मारामारी ..तुरुंग ..वेगवेगळ्या दुखा:चा सामना करावा लागला ..शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात रहावे लागले ..त्यावेळी माझी अवस्था पराभूत झाल्याची होती ..मी स्वताच्या जोरावर आयुष्यातील सर्व समस्या सोडवण्यास असमर्थ ठरलो होतो ..इतकेच काय एक सर्वसामन्य माणूस म्हणून जगण्याची देखील लायकी राहिली नव्हती माझी .जिवन सुंदर होण्या पेक्षा जगणे शिक्षा बनून गेले होते ..या नरक यातनातून बाहेर कसे पडावे हे उमगत नव्हते ..मात्र जेव्हा मी अगदी समजायला लागल्यापासून जीवनाचा आढावा घेतला ..स्वतःच्या विचारांचे ..भावनांचे ..वर्तनाचे परीक्षण केले ..माझ्या स्वभावातील त्रुटी शोधल्या ..निसर्गाचे.. सृष्टीचे..आणि त्याच्याही वर असलेल्या परम शक्तीचे अस्तित्व मान्य केले ( ज्याला लोक परमेश्वर ..देव ..ईश्वर ..अल्ला .जिजस ..अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतात ) तेव्हाच मला सुटकेचा मार्ग सापडला ...श्रीमद भगवत गीतेत श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे ..तसेच विपश्यनेत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे ..संत तुकाराम ..नामदेव ..ज्ञानेश्वर ..अश्या वेगवेगळ्या संतानी सांगितलेल्या मार्गाचे अध्ययन करू लागलो..मग व्यसनमुक्ती सोबतच जिवन सुंदर होण्याची वाटचाल सुरु झाली . जिवन आपोआप सुंदर होत नाही तर त्याला आकार देण्यासाठी ..सुंदर करण्यासाठी प्रत्यत्न करावे लागतात ..मेहनत व्हावी लागते ..श्रद्धा असावी लागते ..स्वार्थ आणि परमार्थ यांचे संतुलन साधावे लागते ..दया..क्षमा..करुणा ..सहिष्णुता ..न्याय ..समानता ..सहनशीलता ..चिकाटी ..सातत्य ..त्याग ..कृतज्ञता ..इतरांना मदत करणे ..प्रत्येकाचा आदर करणे ..अश्या प्रकारच्या नैतिक मूल्यांचे आचरण करण्याचा प्रयत्न करावा लागला ..त्यातूनच मला जिवनाशी लढा घेण्याची ..संघर्ष करण्याची शक्ती मिळत गेली ..

सुखी ..समाधानी ..सुंदर जीवनाचे रहस्य उलगडू लागले ..माझ्या आणि इतरांच्या अनुभवातून ...थोर व्यक्तींच्या आत्मचरीत्रातून ..त्यांनी केलेल्या संघर्षातून ..मला जिवन समजत गेले ..मला समजलेली जीवनाची काही वैशिष्ट्ये खाली देत आहे

१ ) आपला जन्म कोणत्या जाती धर्मात व्हावा ..आपले रंगरूप कसे असावे ...आपली शरीर यष्टी कशी असावी हे आपल्या हाती नसले तरी देखील निराश किवा दुखी; न होता ... आपल्याला निसर्गाने जे काही दिले आहे ते जर स्वीकारले ..जोपासले ..त्याचे संगोपन केले ..तर ते सुंदर होत जाते ..जे मिळाले आहे ते निश्चितच आपल्यालाच नव्हे तर इतरानाही आवडू लागते .

२ ) प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेने घडावी ..हा अट्टाहास सोडून देवून ..जे घडते आहे ते मान्य करून ..त्यातून आपल्याला निसर्ग काहीतरी शिकवण देवू इच्छित आहे हे समजून घेतले ..तर आपल्याला निराशा ..राग ..भीती ..न्यूनगंड या भावनांपासून स्वतचा बचाव करता येतो व तडजोड करून जे मनाविरुद्ध घडते आहे त्यातही समाधान मानता येते .

३ ) पृथ्वी ..अग्नी ..जल ..वायू .आकाश या महान तत्वांपासून सृष्टीची निर्मिती झाली असून प्रत्येक जीव याच पासून बनलेला आहे ..या तत्वांचे आपल्या शरीरात संतुलन साधले तर आपल्याला अनेक आजारांपासून स्वताचा बचाव करता येतो ..तसेच व्यायाम ..योग साधना ..प्राणायाम ..ध्यान ..अश्या गोष्टींचा आपल्या जीवनशैलीत समावेश केला तर आपल्या आचार विचारात बदल होतो ..आपली शरीरिक आणि मानसिक शक्ती वाढत जाते जी आपल्या प्रगती साठीआपल्याला मदत करते .

४) प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी दुख: असते.. काहीतरी न्यूनता असते ..काहीतरी कमतरता असते ..काहीतरी समस्या असतेच ..जी कदाचित कधीही नष्ट होत नाही .तेव्हा प्रसन्न पणे ते दुख: ..समस्या...कमतरता स्वीकारून आपल्याला त्या समस्येला तोंड देण्याची शक्ती मिळते ..त्या समस्येसहित समाधानी राहता येते .

५ ) जगात आपल्या पेक्षा अनेक जीव दिन ..दुबळे ..गरीब ..अपंग .अनाथ ..अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या मानाने आपले दुख: काहीच नाही हे समजून घेवून केवळ स्वतःचे दुख: कुरवाळत न बसता ..आपल्याला जे चांगले मिळाले आहे त्याबद्दल निसर्गाचे आभार मानले पाहिजेत ..इतरांच्या दुख: निवारणासाठी त्यांना मदत केली पाहिजे .

६ ) क्रमाने बाल्यावस्था ..कुमारवय ..तारुण्य ..प्रौढत्व ..वृद्धत्व ..या जिवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ..या प्रत्येक अवस्थेत काहीतरी समस्या ..अडचणी ..असतात ..मात्र त्यांनी खचून न जाता ..निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमता ओळखून त्यांचा सकारात्मक वापर करून आपण सुखी होऊ शकतो .

७ ) निसर्गाचा एक नियम आहे जो न्यूटन ने शास्त्रीय भाषेत मांडला असून .." निसर्गात प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते " म्हणजेच कर्म आणि फल असा हा सिद्धांत आहे ..तेव्हा आपल्या प्रत्येक कर्माबाबत नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे .इतरांना दुख;होईल ..इतरांवर अन्याय होईल ..इतरांना लुबाडले जाईल ..इतरांना त्रास होईल ..असे वर्तन न करता इतरांना आनंद होईल ..त्यांना समाधान मिळेल ..मदत होईल असे वर्तन केले तर प्रतिक्रिया म्हणून आपल्याही जीवनात आनंद निर्माण होतो .

८ ) जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम असून प्रत्येकाला कधी न कधी मृत्यू येणारच आहे ..फक्त मृत्यू येण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ..तेव्हा मृत्यूची खंत न बाळगता आहे ते जिवन कसे समर्थपणे जगता येईल ..आणि मृत्युनंतर देखील आपण समाजाला कसे मार्गदर्शक राहू शकू याचा विचार करून जिवंतपणी असे काही कर्म करावे की मृत्युनंतर देखील लोक आपल्याला चांगल्या अर्थाने ओळखतील .

९ ) काम ..क्रोध ..लोभ .मद ..मोह ..मत्सर या भावना माझ्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण करतात ..आणि इच्छापूर्ती साठी अनेकदा आपण इतरांना त्रास देतो आहे याचे भान राहत नाही जेव्हा माझ्या मनात अश्या भावना उफाळून येतात तेव्हा राग ..खुन्नस ..सूड ..बदला ..असूया ..लबाडी ..फसवणूक ..तिरस्कार ..द्वेष ..हिंसा या भावना देखील जोडीने या मनात निर्माण होतात ..अशा भावना वेळीच ओळखून त्यांचे उच्चाटन करणे योग्य असते ..कारण अशा भावना आपल्या मन:शांतीच्या आड येवून स्वतःला तसेच इतरांना देखील हानी पोचवतात ..

१० ) अनेकदा जिवन जगणे म्हणजे एक शिक्षा .कठीण दिव्य ..अग्निपरीक्षा ..असे वाटले तरी ..निसर्ग जश्या आपल्या जीवनात समस्या निर्माण करतो तशीच आपल्याला त्या समस्या निवारण्याची किवा सहन करण्याची क्षमता देखील देत असतो ...आपल्या मर्यादा आणि क्षमता ओळखता आल्या तर नक्कीच समस्या त्रासदायक न वाटता आपल्याला ते एक आव्हान असते हे लक्षात येवू शकते .

वरील गोष्टी ध्यानात आल्यावर मी त्या नुसार आचरण करण्याचा प्रयत्न करू लागलो ..परिस्थिती ..घटना ..माणसे बदलण्याचा अट्टाहास सोडून देवून स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करू लागलो ..तसे तसे माझे जिवन सुंदर होऊ लागले ...

दैनिक गावकरी ( नाशिक ) साठी पाठवलेला लेख !

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

डोक्याचे दही ????काल बिलासपूर येथून एका अल्कोहोलिकला पालखी करून आणलेय उपचारांसाठी ..वय वर्षे ३४ मायनिंग इंजिनिअरची पदवी ..दिसायला एकदम स्मार्ट ..उंच देखणा बिलासपुरला मोडेलिंग च्या स्पर्धेत बक्षिस मिळवलेला ..मॉडेल होण्याची स्वप्ने पाहणारा असा हा तरुण.. आमच्याकडे दोन वर्षापूर्वी आधी उपचाराला आला होता.. तेव्हा अतिशय उत्साही ..हसतमुख ..सुमारे दोन महिने त्याने उपचार घेतले ..मग बाहेर गेल्यावर काही काळ चांगला राहिला ..मात्र त्याने फॉलोअप ठेवला नाही ..आता इतके दिवस दारू प्यायलो नाही तेव्हा एखादेवेळी घेतली तर काय हरकत आहे या विचाराने पुन्हा एकदा दारू घेतली ..मात्र अल्कोहोलिक असल्याने एकदा सुरु झाले कि थांबता येत नाही या संशोधनानुसार पुन्हा नियमित पिणे सुरु झाले ..व्यसनाधीनता या आजाराचा कनिंग भाग असा की एकदा पिणे सुरु झाले कि व्यसनाचे समर्थन सुरु होते ..व्यसनमुक्ती केंद्रात जायची इच्छा होत नाही ..मग कुटुंबीयांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू नये ..म्हणून व्यसनमुक्ती केंद्राबद्दल खोट्या तक्रारी करणे वगैरे सुरु होते ..तसेच झाले या केस मध्ये पण ..त्याने आई वडिलांना काहीतरी खोटेनाटे सांगून आमच्या केंद्र बद्दल तक्रार केली ..त्यामुळे मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी पुन्हा त्याला उपचार देणे टाळले .सुधारेल आपोआप किवा काहीतरी चमत्कार होईल याची वाट पाहत राहिले ..

हळू हळू त्याच्या मेंदूवर दारूचे दुष्परिणाम होऊ लागले ..असंबंध बडबड ...व्यसनासाठी घरात चोऱ्या..भांडणे सुरु झाली ...शेवटी चार दिवसांपूर्वी प्रकरण हाताबाहेर जातेय हे पाहून मोठ्या भावाने आम्हाला फोन केला ..व उचलून आणण्यास बोलावले ..आईवडील त्याच्या प्रेमात आंधळे झालेत हे सांगितले ..काल आम्ही जेव्हा रात्री पोचलो तेव्हा कळले कि दुपारी दोन पासून घरातून गायब होता ..दोन दिवस दारू प्यायला नव्हता ..मात्र मेंदूला दारूचा नियमित कोटा न मिळाल्याने संभ्रमाची अवस्था सुरु झालेली ..त्या अवस्थेत तो घराबाहेर पडलेला ..भावाने आणि त्याच्या मित्राने शोधाशोध सुरु केली ..शेवटी बिलासपुर रेल्वे स्टेशनवर विमनस्क ..हरवल्यासारखी मुद्रा करून बसलेला सापडला ..शरीर खंगलेले ..कोणीतरी मारल्यामुळे तोंड सुजलेले ..असंबद्ध बडबड आणि हातवारे चालूच होते .. त्याला तेथून धरून गाडीत बसवून रात्री १ वाजता निघालो परत नागपूरकडे ..पूर्वी आमच्याकडे उपचारांना चांगला दोन महिने दाखल असूनही त्याने आम्हाला ओळखले नाही .गुपचूप गाडीत बसला ..मध्ये मध्ये भानावर येवून कुठे चाललो आहोत आपण हे विचारात होता ..बाकी सर्व वेळ ..जुन्या प्रेयसीच्या आठवणी ...मॉडेलिंग स्पर्धेच्या आठवणी ..अशी असंबद्ध बडबड आणि हातवारे आरडओरडा सुरूच होता ..वाटेत आम्ही त्याची दया येवून त्याला थोडीशी दारू पाजावी म्हणजे थोडा तरी भानावर येवून त्याची बडबड कमी होईल ..असे ठरवले ..त्यानुसार पाहते चार वाजता एक क्वार्टर घेवून त्याला एक पेग पाजला ..त्या नंतर जेमतेम एक तासभर शांत बसला ..एकदम गंभीर झाल्यासारखे बसून राहिला ..नंतर त्या पेगचा परिणाम उतरल्यावर परत तसेच हातवारे सुरु झाले ..सकाळी दहाला सेंटरला येईपर्यंत त्याला थोडी थोडी करून पूर्ण क्वार्टर पाजली ..आता परत हातवारे सुरु आहेत ..उद्या त्याला मानसोपचार तज्ञांना दाखवले जाईल ..नंतर डोक्यावर झालेल्या परिणामांसाठी औषधे सुरु होतील ..माहित नाही किती काळ लागेल त्याला पूर्ण भानावर येवून सतत भानावर राहायला ..किमान सहा महिने तरी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात राहून नियमित औषधे घेतली तर तो पूर्ण बरा होईल मानसिक गडबडीतून ..मात्र नंतर त्याने पुन्हा कधीही दारू पिवू नये हे पथ्य त्याला कायम पाळावे लागेल ..त्यासाठी आईवडिलांनी त्यांची वेडी माया बाजूला ठेवून उपचारात योग्य सहभाग घेतला पाहिजे ..आम्ही सांगतो तसे ऐकले पाहिजे ..तरच पोरगा हाताशी लागेल ..अन्यथा रस्त्यावर अनाथ फिरणारा ..ओळख हरवलेला ..मनोरुग्ण बनून राहील !

मी खरोखरच खूप भाग्यवान आहे कारण मला यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि माझ्या डोक्यावर कायमचा काही परिणाम झाला नाही !

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

आत्मशोध !

आत्मशोध !

१) स्वतःकडे जेव्हा काही दाखवण्यासारखे गुण नसले की मी इतर लोक कसे नालायक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो . 

२) माझे नसलेले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी मला वारंवार माझ्या जाती धर्मातील महा पुरुष्यांच्या कर्तुत्वाचे दाखले द्यावे लागतात . 

३) माझ्या कमतरता शोधून त्या दूर करण्याएवजी मी समाज सुधारणेच्या मोठ्या गप्पा मारून स्वतचे समाधान करून घेत असतो .

४) मला नेहमी माझ्यावर 'अन्याय ' होतोय असे वाटत राहते त्यामुळे तसे न होण्यासाठी मी ' आक्रमक ' पवित्रा घेत असतो .

५) मला दिवसभरात कोणालातरी कशावरून तरी उघड अथवा मनातल्या मनात शिवीगाळ केल्याशिवाय चैन पडत नाही आणि तसे केले नाही तर माझी बंडखोरी आणि क्रांतिकारी वृत्ती नष्ट होईल आणि लोक मला भेकड समजतील असे मला वाटते .

६) मला वैचारिक विरोध देखील सहन होत नाही कारण समस्त जगात मीच एकमात्र शहाणा आहे असा माझा पक्का समज असतो .

७) मानवता , समानता , हे शब्द वारंवार माझ्या बोलण्यात येतात मात्र या सर्व गोष्टी माझ्या कृतीमध्ये नसतात

८) व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मी स्वैराचार करत असतो आणि तो मला देशाच्या घटनेने दिलेला अधिकार आहे अशी माझी समजूत आहे .

९) मी कधीही एखाद्या भिकाऱ्याला १ रुपया देखील न देता समाजाचे भले करण्याची स्वप्ने पाहतो .

१० ) परमेश्वराने मला खास निर्माण केलेले असून मी आहे तसाच अतिशय चांगला आहे आणि तसाच राहणार या समजुतीतून मी परिस्थिती , लोक वैगरे बदलले पाहिजेत असा प्रचार करतो .

वरील गोष्टी जर माझ्यात आढळल्या तर मला नक्कीच मानसोपचार तज्ञाची गरज आहे हे समजावे