शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

आणि ..जिवन सुंदर झाले !


आपले जिवन सुंदर ..सुखी ..समाधानी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते ..प्रत्येकाची जिवन सुंदर व्हावे या साठी नेहमीच धडपड सुरु असते ..तसेच जीवनाच्या सुंदरते बद्दलची प्रत्येकाची व्याख्या देखील वेगवेगळी असू शकते ...बहुतेकांच्या जिवनाच्या सुंदरतेच्या व्याख्येत ...नेहमी आपल्या मनासारखे घडावे ..आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी ..आपल्याकडे भरपूर पैसा असावा ..समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा ..आपल्या कुटुंबात कोणतेही आजार ..कलह..भांडणे असू नयेत...इतकेच काय आपण दिसायला सुंदर ..देखणे ..असावे ..सर्वांनी आपली तारीफ करावी ..आपल्यावर कधीही कोणतेही संकट येवू नये ..असे सगळे समाविष्ट असते ...दुर्दैव असे की असे सर्वार्थाने सुंदर जिवन कोणालाच प्राप्त होत नाही ..म्हणून तर समर्थ रामदासांनी म्हंटले आहे ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ..विचारी मना तूच शोधूनी पाहे ' ..

माझ्या जिवनाच्या सुंदरतेच्या व्याख्येत असेच सगळे होते ..आणि मी सुखी होण्या ऐवजी अधिक अधिक दुखी: होत गेलो ..कारण मला सगळे माझ्या इच्छेप्रमाणे घडायला हवे हा अट्टाहास सोडता येत नव्हता ..अगदी माझी शरीरयष्टी ..माझे आईवडील ..माझी जात धर्म ..कुटुंबाची सांपत्तिक स्थिती ..सगळे माझ्या मनासारखे मिळाले पाहिजे असे वाटे ..इतकेच काय माझ्या सभोवतालची परिस्थिती नेहमी मला हवी तशी असावी ..माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला आवडेल ..रुचेल असे वर्तन करावे असे मला वाटे ..जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध घडे तेव्हा तेव्हा मी निराश ..उदास ..वैफल्यग्रस्त ..भीतीग्रस्त ..होई किवा मला आसपासच्या लोकांचा.. परिस्थितीचा .कधी कधी स्वतःचा प्रचंड राग येई ..माझ्यावर अन्याय होतोय असे वाटे किवा न्यूनगंड निर्माण होई .. याच्या उलट जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखे घडे तेव्हा तेव्हा मला इतका आनंद होई की तो आनंद उन्मादाच्या पातळीवर घेवून जाई मला ..मग मी स्वतःला खूप कर्तुत्ववान समजू लागे ..इतर लोक माझ्यापेक्षा खूप छोटे आहेत असे भासे ..मी इतरांवर अधिकार गाजवत असे ..त्याच्या भावनांची पर्वा न करता त्यांच्याशी तुसडेपणाने अथवा बेदरकारपणे वर्तन करत असे ..अश्या वेळी माझा अहंकार वाढलेला असे ..मीच प्रत्यक्ष कर्ता करविता आहे अश्या भ्रमात मी वावरत असे .म्हणजे " अहं ब्रह्मास्मी " अशी अवस्था निर्माण होऊन मी स्वैर वर्तन करू लागे ..

एकंदरीत मनाविरुद्ध घडले की निराशा...वैफल्य..दुख: अन्यायग्रस्त असल्याची भावना आणि मनासारखे घडले की ' माज ' अशी माझी स्थिती होई .याच भावनांच्या ओघात माझ्या आयुष्यात आधी सिगारेट .मग दारू ..गांजा ..चरस ..भांग .अफू ..ताडी ..ब्राऊन शुगर अश्या व्यसनांनी प्रवेश केला..या व्यसनांचे वैशिष्ट्य असे की यांचे सेवन केल्यावर तात्पुरते काही काळ मला माझ्या सर्व समस्या सुटल्या सारखे वाटे ..किवा सर्व समस्या मी चुटकी सरशी सोडवू शकतो असा आभास निर्माण होई ..तसेच या व्यसनांच्या अंमलाखाली असताना माझ्यात प्रचंड शक्तीचा संचार होत आहे असे वाटे ..मी कोणालाही घाबरत नाही ..मी कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देवू शकतो अशी असामान्य असल्याची भावना निर्माण होई ..अश्या अवस्थेत संगीत ..नृत्य ..चित्र ..अशा सर्व कलांचा मी उत्तम प्रशंसक होई ..माझ्यातील प्रतिभा .हुशारी ..कर्तुत्व जागृत झाल्यासारखे वाटे ..अतिशय तरल ..सूक्ष्म ..इतरांना न समजू शकणाऱ्या भावना माझ्या मनात निर्माण होऊन आपण सुखी असल्याचा आभास निर्माण होई ..झटपट मिळणारा हा आनंद ..कोणालाही भावेल असाच होता .. मी या आनंदाच्या शोधात ..वारंवार आनंदाची ही अवस्था मिळावी म्हणून मी पाहता पाहता या व्यसनांच्या आहारी गेलो ..त्यांचा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या गुलाम झालो ..मग सुरवातीला मिळणारी आनंदाची अवस्था मिळवण्यासाठी मला व्यसनांचे प्रमाण वाढवणे गरजेचे झाले ..सतत या नशेच्या अमलाखाली असावे असे वाटू लागले ..नशा उतरली की जीवनातले वास्तव मला सहन होत नसे.. म्हणून पुन्हा नशा करत गेलो ..आणि एका अध:पतनाचा प्रवास सुरु झाला ..आर्थिक .मानसिक ..शारीरिक ..कौटुंबिक ..सामाजिक आणि नैतिक पातळीवर अधिक अधिक घसरण होत गेली ..मला मेंटल हॉस्पिटल मध्ये रहावे लागले..फुटपाथवर झोपावे लागले ..अपमानित होत गेलो ..खोटे बोलणे ..घरात ..घराबाहेर व्यसनांसाठी चोऱ्या करणे ..भांडणे ...शिवीगाळ ..मारामारी ..तुरुंग ..वेगवेगळ्या दुखा:चा सामना करावा लागला ..शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात रहावे लागले ..त्यावेळी माझी अवस्था पराभूत झाल्याची होती ..मी स्वताच्या जोरावर आयुष्यातील सर्व समस्या सोडवण्यास असमर्थ ठरलो होतो ..इतकेच काय एक सर्वसामन्य माणूस म्हणून जगण्याची देखील लायकी राहिली नव्हती माझी .जिवन सुंदर होण्या पेक्षा जगणे शिक्षा बनून गेले होते ..या नरक यातनातून बाहेर कसे पडावे हे उमगत नव्हते ..मात्र जेव्हा मी अगदी समजायला लागल्यापासून जीवनाचा आढावा घेतला ..स्वतःच्या विचारांचे ..भावनांचे ..वर्तनाचे परीक्षण केले ..माझ्या स्वभावातील त्रुटी शोधल्या ..निसर्गाचे.. सृष्टीचे..आणि त्याच्याही वर असलेल्या परम शक्तीचे अस्तित्व मान्य केले ( ज्याला लोक परमेश्वर ..देव ..ईश्वर ..अल्ला .जिजस ..अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतात ) तेव्हाच मला सुटकेचा मार्ग सापडला ...श्रीमद भगवत गीतेत श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे ..तसेच विपश्यनेत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे ..संत तुकाराम ..नामदेव ..ज्ञानेश्वर ..अश्या वेगवेगळ्या संतानी सांगितलेल्या मार्गाचे अध्ययन करू लागलो..मग व्यसनमुक्ती सोबतच जिवन सुंदर होण्याची वाटचाल सुरु झाली . जिवन आपोआप सुंदर होत नाही तर त्याला आकार देण्यासाठी ..सुंदर करण्यासाठी प्रत्यत्न करावे लागतात ..मेहनत व्हावी लागते ..श्रद्धा असावी लागते ..स्वार्थ आणि परमार्थ यांचे संतुलन साधावे लागते ..दया..क्षमा..करुणा ..सहिष्णुता ..न्याय ..समानता ..सहनशीलता ..चिकाटी ..सातत्य ..त्याग ..कृतज्ञता ..इतरांना मदत करणे ..प्रत्येकाचा आदर करणे ..अश्या प्रकारच्या नैतिक मूल्यांचे आचरण करण्याचा प्रयत्न करावा लागला ..त्यातूनच मला जिवनाशी लढा घेण्याची ..संघर्ष करण्याची शक्ती मिळत गेली ..

सुखी ..समाधानी ..सुंदर जीवनाचे रहस्य उलगडू लागले ..माझ्या आणि इतरांच्या अनुभवातून ...थोर व्यक्तींच्या आत्मचरीत्रातून ..त्यांनी केलेल्या संघर्षातून ..मला जिवन समजत गेले ..मला समजलेली जीवनाची काही वैशिष्ट्ये खाली देत आहे

१ ) आपला जन्म कोणत्या जाती धर्मात व्हावा ..आपले रंगरूप कसे असावे ...आपली शरीर यष्टी कशी असावी हे आपल्या हाती नसले तरी देखील निराश किवा दुखी; न होता ... आपल्याला निसर्गाने जे काही दिले आहे ते जर स्वीकारले ..जोपासले ..त्याचे संगोपन केले ..तर ते सुंदर होत जाते ..जे मिळाले आहे ते निश्चितच आपल्यालाच नव्हे तर इतरानाही आवडू लागते .

२ ) प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेने घडावी ..हा अट्टाहास सोडून देवून ..जे घडते आहे ते मान्य करून ..त्यातून आपल्याला निसर्ग काहीतरी शिकवण देवू इच्छित आहे हे समजून घेतले ..तर आपल्याला निराशा ..राग ..भीती ..न्यूनगंड या भावनांपासून स्वतचा बचाव करता येतो व तडजोड करून जे मनाविरुद्ध घडते आहे त्यातही समाधान मानता येते .

३ ) पृथ्वी ..अग्नी ..जल ..वायू .आकाश या महान तत्वांपासून सृष्टीची निर्मिती झाली असून प्रत्येक जीव याच पासून बनलेला आहे ..या तत्वांचे आपल्या शरीरात संतुलन साधले तर आपल्याला अनेक आजारांपासून स्वताचा बचाव करता येतो ..तसेच व्यायाम ..योग साधना ..प्राणायाम ..ध्यान ..अश्या गोष्टींचा आपल्या जीवनशैलीत समावेश केला तर आपल्या आचार विचारात बदल होतो ..आपली शरीरिक आणि मानसिक शक्ती वाढत जाते जी आपल्या प्रगती साठीआपल्याला मदत करते .

४) प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी दुख: असते.. काहीतरी न्यूनता असते ..काहीतरी कमतरता असते ..काहीतरी समस्या असतेच ..जी कदाचित कधीही नष्ट होत नाही .तेव्हा प्रसन्न पणे ते दुख: ..समस्या...कमतरता स्वीकारून आपल्याला त्या समस्येला तोंड देण्याची शक्ती मिळते ..त्या समस्येसहित समाधानी राहता येते .

५ ) जगात आपल्या पेक्षा अनेक जीव दिन ..दुबळे ..गरीब ..अपंग .अनाथ ..अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या मानाने आपले दुख: काहीच नाही हे समजून घेवून केवळ स्वतःचे दुख: कुरवाळत न बसता ..आपल्याला जे चांगले मिळाले आहे त्याबद्दल निसर्गाचे आभार मानले पाहिजेत ..इतरांच्या दुख: निवारणासाठी त्यांना मदत केली पाहिजे .

६ ) क्रमाने बाल्यावस्था ..कुमारवय ..तारुण्य ..प्रौढत्व ..वृद्धत्व ..या जिवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत ..या प्रत्येक अवस्थेत काहीतरी समस्या ..अडचणी ..असतात ..मात्र त्यांनी खचून न जाता ..निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमता ओळखून त्यांचा सकारात्मक वापर करून आपण सुखी होऊ शकतो .

७ ) निसर्गाचा एक नियम आहे जो न्यूटन ने शास्त्रीय भाषेत मांडला असून .." निसर्गात प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते " म्हणजेच कर्म आणि फल असा हा सिद्धांत आहे ..तेव्हा आपल्या प्रत्येक कर्माबाबत नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे .इतरांना दुख;होईल ..इतरांवर अन्याय होईल ..इतरांना लुबाडले जाईल ..इतरांना त्रास होईल ..असे वर्तन न करता इतरांना आनंद होईल ..त्यांना समाधान मिळेल ..मदत होईल असे वर्तन केले तर प्रतिक्रिया म्हणून आपल्याही जीवनात आनंद निर्माण होतो .

८ ) जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम असून प्रत्येकाला कधी न कधी मृत्यू येणारच आहे ..फक्त मृत्यू येण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ..तेव्हा मृत्यूची खंत न बाळगता आहे ते जिवन कसे समर्थपणे जगता येईल ..आणि मृत्युनंतर देखील आपण समाजाला कसे मार्गदर्शक राहू शकू याचा विचार करून जिवंतपणी असे काही कर्म करावे की मृत्युनंतर देखील लोक आपल्याला चांगल्या अर्थाने ओळखतील .

९ ) काम ..क्रोध ..लोभ .मद ..मोह ..मत्सर या भावना माझ्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण करतात ..आणि इच्छापूर्ती साठी अनेकदा आपण इतरांना त्रास देतो आहे याचे भान राहत नाही जेव्हा माझ्या मनात अश्या भावना उफाळून येतात तेव्हा राग ..खुन्नस ..सूड ..बदला ..असूया ..लबाडी ..फसवणूक ..तिरस्कार ..द्वेष ..हिंसा या भावना देखील जोडीने या मनात निर्माण होतात ..अशा भावना वेळीच ओळखून त्यांचे उच्चाटन करणे योग्य असते ..कारण अशा भावना आपल्या मन:शांतीच्या आड येवून स्वतःला तसेच इतरांना देखील हानी पोचवतात ..

१० ) अनेकदा जिवन जगणे म्हणजे एक शिक्षा .कठीण दिव्य ..अग्निपरीक्षा ..असे वाटले तरी ..निसर्ग जश्या आपल्या जीवनात समस्या निर्माण करतो तशीच आपल्याला त्या समस्या निवारण्याची किवा सहन करण्याची क्षमता देखील देत असतो ...आपल्या मर्यादा आणि क्षमता ओळखता आल्या तर नक्कीच समस्या त्रासदायक न वाटता आपल्याला ते एक आव्हान असते हे लक्षात येवू शकते .

वरील गोष्टी ध्यानात आल्यावर मी त्या नुसार आचरण करण्याचा प्रयत्न करू लागलो ..परिस्थिती ..घटना ..माणसे बदलण्याचा अट्टाहास सोडून देवून स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करू लागलो ..तसे तसे माझे जिवन सुंदर होऊ लागले ...

दैनिक गावकरी ( नाशिक ) साठी पाठवलेला लेख !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा