शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

तंबाखू , खर्रा , गुटखा , धुम्रपान ..ई सोडण्यासाठी !


मला वयाच्या १६ व्या वर्षापासून..कुतूहल..अनुकरण वगैरे कारणांनी धूम्रपानाची सवय लागली होती ..हळू हळू त्या सवयीचे व्यसनात रुपांतर झाले ..मग प्रत्येक वेळी काही खाल्ल्यावर ..चहा प्यायल्यावर ..कंटाळा आला म्हणून ..बोअर झालो म्हणून ..टेन्शन आहे...डोक्याला शांतता म्हणून ..झोपण्यापूर्वी .सकाळी उठल्याबरोबर ..असे ते व्यसन सुरूच राहिले ..त्या नंतर मी दारू ..चरस ..गांजा ..ताडी ..भांग व शेवटी ब्राऊनशुगर अशा गंभीर व्यसनांकडे देखील ओढला गेलो ..त्या सगळ्यात आयुष्याची सुमारे २५ मौल्यवान वर्षे वाया गेल्यानंतर मी वयाच्या ४० व्या वर्षी ईश्वराच्या कृपेने...तसेच मुक्तांगण ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस ..व इतर व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घेवून दारू पासून इतर सगळी व्यसने सोडली . मात्र तरीही गेली दहा वर्षे धूम्रपानाचे व्यसन काही सुटत नव्हते ..मी देखील ते सुटण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करत नव्हतो ..शेवटी मनाचा हिय्या करून धुम्रपान देखील बंद करावे हे ठरवले ..काय त्रास होईल तो सहन करू असा मनाचा निर्धार केला ..स्वताच्या मानसिक शक्तीवर केलेले दोन तीन प्रयत्न विफल झाले ..काही दिवसातच पुन्हा धुम्रपान सुरु होऊ लागले ..शेवटी औषधांची मदत घ्यावी हे ठरवले ..त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या निकोरेट / निकोटेक्स / निकोगम या निकोटीन युक्त च्युइंगमची आणि प्राणायामाची मदत घेण्याचे ठरवून सुरवात केली ..पाहता पाहता त्याला आता एक महिना होऊन गेला ..मी धूम्रपानापासून दूर आहे ..शारीरिक अवलंबित्व संपलेय ..मानसिक अवलंबित्व अजून पूर्ण गेले नाही ..तरीही या पुढे काहीही झाले तरी एकदाही धुम्रपान करायचे नाही हा निश्चय केला आहे ..तो पाळता येतोय सहजपणे ! काल मी धुम्रपान सोडल्या नंतर मला जाणवणारे फायदे शेअर केले होते ..अनेक मित्रांनी त्यांना देखील तंबाखू अथवा इतर तंबाखूजन्य व्यसने बंद करायची आहेत ..त्या साठी मार्गदर्शन करावे अशी विचारणा केली ..म्हणून त्यांच्या साठी खालील सूचना देत आहे ! या सूचनांच्या मदतीने नक्की त्यांना व्यसनमुक्त होता येईल अशी आशा आहे !
सूचना !
१ ) माझे व्यसन फारसे गंभीर नाही ..मी दिवसातून एकदोन वेळाच व्यसन करतो..असे ज्यांना वाटते त्यांना या सूचनांचा फायदा कितपत होईल या बाबत शंकाच आहे ..सर्व प्रथम मी जरी कमी प्रमाणात व्यसन करीत असलो तरीही..ते देखील भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकते ..मला कॅन्सर सारख्या निर्दय व जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागू शकते हे स्वता:शी ठरवले पाहिजे मगच प्रयत्न गंभीरपणे करता येतात . थोडे थोडे करून बंद करू असा विचार करणार्यांनी तो विचार सोडून द्यावा ..कोणतेही व्यसन असे थोडे थोडे करून बंद करता येत नाही .
२ ) आपण हे व्यसन कोणावर उपकार म्हणून अथवा बायकोच्या किवा कुटुंबियांच्या आग्रहावरून सोडत आहोत असा अविर्भाव अजिबात नको ..आपण स्वतःच्या फायद्यासाठी हे व्यसन सोडत आहोत ही मनाशी खुणगाठ ठेवा .
३ ) आपण व्यसन सोडले तरी आपल्या आसपास व्यसन करणारे अनेक लोक असतील.. जे कदाचित आपल्याला आग्रह करू शकतात एखाद्या वेळी घ्या असा ..त्यांना नम्रपणे नकार देण्याची मानसिक ताकद बाळगा .
४ ) प्रत्यक्ष व्यसन बंद करायला सुरवात करताना मेडिकल स्टोर्स मध्ये तंबाखूजन्य व्यसने सोडण्यासाठी कमी प्रमाणात निकोटीन असलेले च्युइंगम मिळतात ..ते विकत घेवून ठेवा..वेगवेगळ्या कंपन्यांचे च्युइंगम बाजारात उपलब्ध आहेत ..निकोरेट ..निकोटेक्स..निकोगम या कंपन्या मला माहित आहेत ..त्या पैकी हे च्युइंगम २ मिलीग्राम व ४ मिलीग्राम.. अशा दोन प्रकारात उपलब्ध आहेत ..जास्त प्रमाणात व्यसन असलेल्या लोकांनी ४ मिलीग्राम चे तर कमी प्रमाण असलेल्या लोकांनी २ मिलीग्रामचे च्युइंगम वापरावे ..तंबाखू अथवा धूम्रपानाची आठवण झाल्यावर हे च्युइंगम तोंडात ठेवून चघळावे..त्यामुळे शारीरिक त्रास कमी होतो ..अस्वस्थता ..हुरहूर ..काहीतरी बिघडले आहे असे वाटणे बंद होते ..एका च्युइंगम चा परिणाम सुमारे चार तास टिकतो ..
५ ) मानसिक त्रास कमी होण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा कपालभाती ..भस्त्रिका .अनुलोम विलोम हे प्राणायाम करावेत ..त्यामुळे मानसिक शांती टिकवण्यास मदत मिळते ..चिडचिड होत नाही ..डोके सुरळीत काम करते .
६ ) वरील सूचनांचा उपयोग करून आपल्याला सहजगत्या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन बंद करता येते ..च्युइंगम किती दिवस घ्यावेत या बाबतच्या सूचना त्या च्युइंगमच्या पाकिटात असलेल्या कागदावर लिहिलेल्या आढळतील त्या वाचा . हे च्युइंगम चघळणे देखील हळू हळू कमी करत जावे .व नंतर काही दिवसांनी पूर्ण बंद करावे .
७) काही लोकांना अपचन ..गॅसेस असा त्रास होऊ शकतो मात्र तो त्रास नगण्य आहे ..तसेच ज्यांना खूप कफ झाला असेल पूर्वीच्या सेवनाने त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने एखादे कफ सिरप काही काळ घेण्यास हरकत नाही ..काही लोकांना झोप सुरळीत होत नाहीय असे वाटेल ..मात्र त्या कडे लक्ष न देता आपला चांगला उपक्रम सुरूच ठेवा ..सुमारे महिन्याभरातच सगळे सुरळीत ..व्यवस्थित होते .
८ ) च्युइंगम अथवा प्राणायाम यांची मदत न घेता देखील केवळ मानसिक मानसिक शक्तीच्या बळावर काही जणांना हे जमू शकेल ..प्रत्येकाने आपल्याला काय सोयीस्कर आहे हे ठरवावे .
९ ) सुमारे आठ दिवसातच आपणास व्यसन बंद केल्याचे फायदे निदर्शनास येतील ...ते फायदे वारंवार मनात आठवावे म्हणजे पुन्हा व्यसन सुरु होण्याचा धोका कमी होतो .
१० ) एकदा व्यसन बंद झाल्यावर पुन्हा कधीही ..कोणत्याही कारणाने ते सुरु करणार नाही असे स्वतःला बजावत रहा..व त्याचे पालन करा ...म्हणजे आपले व्यसन कायमचे बंद राहण्यास मानसिक ताकद मिळेल .
मी जे केले ते येथे नमूद केले आहे ..काही लोकांना अन्य मार्ग माहित असतील त्यांचा देखील वापर करण्यास हरकत नाही . व्यसन बंद करणे महत्वाचे आहे ..लक्षात ठेवा व्यसन मुक्त जीवन खूप सुंदर आहे ..आपल्या सगळ्या शारीरिक व मानसिक क्षमता त्यामुळे वापरता येतात ..दिवसभर उत्साही वाटते ..कार्यक्षमता वाढते ..आरोग्यपूर्ण जीवन ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे ...
या सोबतच योगाभ्यास व प्रमाणाम करीत राहिले तर आपल्या क्षमता वाढवता येतात ..व यशाची नवनवीन शिखरे आपल्याल सर करता येतात . येणाऱ्या नवीन वर्षासाठी हा व्यसनमुक्तीचा आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा संकल्प करा !
ही माहिती शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व या व्यसनमुक्तीच्या चळवळीस हातभार लावा !
सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

२ टिप्पण्या: