रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

खोटी प्रतिष्ठा !काल एक पालक आमच्याकडे उपचारांसाठी दाखल केलेल्या त्यांच्या मुलाला भेटायला आले होते...त्या मुलाला बाहेर एका महत्वाच्या कामासाठी न्यायचे होते ,,दोन तास बाहेर जावून तो परत येणार होता उपचारांना ..( महत्वाचे काम असेल तर असे गेट पास वर काही काळ बाहेर जाता येते उपचार घेत असताना ) बहुधा पालकांसोबत बाहेर आम्ही सोडत नाही अश्या वेळी .कारण तो उपचारी मित्र पालकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करून केंद्रात परत येणे टाळतो ..म्हणून त्याला बाहेर कामासाठी नेवून आणण्याची जवाबदारी आम्ही आमच्या कार्यकर्त्यावरच सोपवतो ..काल त्याचे आईवडील आमच्या कार्यकर्त्याला त्याला बाहेर कामासाठी नेण्याबाबत सूचना देत असताना ..त्या उपचारी मित्राला म्हणाले .." बेटा..तू मैत्रीच्या इमारतीच्या बाहेर पडल्यावर तोंडाला रुमाल बांध..म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही .. तू येथे उपचार घेतो आहेस हे समजणार नाही कोणाला " हे ऐकून वाटले ..जर पालकच आपला माणूस ' व्यसनाधीनता या आजाराने ग्रस्त असून त्याला उपचार घेणे गरजेचे आहे व त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही हे स्वीकारत नसतील तर तो उपचार घेणारा मुलगा तरी कसे स्वीकारणार ? ..शिवाय आईवडील दोघेही प्राध्यापक आहेत ..मात्र आपला मुलगा सध्या नालायक असून त्याला उपचार देण्यात कोणताही कमीपणा नाही हे त्यांना कोण समजावणार ? आणि खोट्या प्रतिष्ठेपायी ते मुलाला किती दिवस पाठीशी घालणार ? गम्मत अशी की मुलगा बार मध्ये मात्र उजळ माथ्याने जातो ..आणि व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय हे मात्र त्यांना लपवावेसे वाटतेय !

मनात आले की हे पालक जर असेच त्या मुलाबाबत वागत राहिले ..त्याला गोंजारत राहिले तर काही काळानी मुलाला नव्हे ....तर त्या पालकांना तोंडाला रुमाल बांधून फिरण्याची वेळ तो मुलगा त्यांच्यावर आणेल यात शंकाच नाही !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा