शनिवार, ६ एप्रिल, २०१३

नवा क्षण , नवा पवित्रा , नवा अनुभव !



विवेकनिष्ठ भावोपचार -
  नवा क्षण , नवा पवित्रा , नवा अनुभव !

 आजवर जीवनात आलेल्या विविध व्यक्ती आणि अनुभवांच्या आधारे जीवनविषयक आणि संपर्कातील व्यक्तींविषयी.... घटना ..परिस्थिती या बद्दल एक दृष्टीकोन प्रत्येकाने मनात तयार करून ठेवला असतो , हा दृष्टीकोन सहजासहजी बदलणे शक्य होत नाही आणि मग त्यामुळे जाती , धर्म , व्यक्ती , प्रसंग , या बाबत प्रतिक्रिया देताना किवा कोणत्याही व्यक्ती अथवा प्रसंगाना सामोरे जाताना हा दृष्टीकोनच आपल्या वागण्या बोलण्याची दिशा ठरवतो . अनेकदा हा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित असतो मात्र आपला आपल्या दृष्टीकोनावर ठाम विश्वास असतो आणि माझा विचार अगदी योग्य आहे .. माझा तसा अनुभव आहे .. अशी समर्थने या दृष्टीकोना मागे आपण देत असतो ...अशा वेळी इतरांचे देखील काही आडाखे ..अंदाज .. दृष्टीकोन असतात . प्रत्येक क्षणी जर आपण व्यक्ती , प्रसंग यांना सामोरे जाताना मनाची पाटी कोरी ठेऊन कोणताही चांगला -वाईट दृष्टीकोन न ठेवता वावरता आले तर किती बरे होईल ? अनेक गोष्टी आपल्याला नव्याने समजतील , नवीन अनुभव देतील आणि नवी शिकवण देखील मिळेल . पण अर्थात आपण शिकण्याच्या भूमिकेत असलो तरच .पूर्वी जेव्हा मी नियमित बसने प्रवास करत होतो तेव्हा बसमधील एका कंडक्टर सोबत सुटे पैसे , व इतर बाबतीत माझा एक दोन वेळा वाद झाला होता आणि हे कंडक्टर असलेच तिरसट असतात , सुटे पैसे मुद्दाम देत नाहीत , पैसे मारतात वैगरे नकारात्मक भाव असलेला दृष्टीकोन माझ्या मनात तयार झाला होता , त्यामुळे त्या बस मध्ये मी नेहमी कडवट मनानेच प्रवास करत असे एकदा बस मध्ये कमी गर्दी असताना मी सहज तो कंडक्टर निवांत असलेला पाहून त्याच्याशी मुद्दाम बोलणे सुरु केले त्याच्या ड्युटी बद्दल , कुटुंबाबद्दल माहिती विचारली , सुरवातीला तो जरा मोजकेच बोलला , कदाचित त्याचा ही माझ्या बद्दल हा माणूस जरा अतिशहाणा आहे , आगावू आहे वैगरे दृष्टीकोन असावा मात्र मी नेटाने बोलत राहिलो तेव्हा तो भरभरून बोलू लागला व त्याने त्याच्या नोकरीतील अडचणी , कटकटी , वरिष्ठांची दादागिरी , व इतर घरगुती समस्या एखाद्या मित्राप्रमाणे सांगितल्या . त्यानंतर माझा त्या कंडक्टर शी कधीच वाद झाला नाही . आपल्याला आवडत नसलेल्या , मनात राग असलेल्या , ज्याच्याशी अजिबात पटत नाही , अशा व्यक्तीशी जरा वेगळ्या, नव्या पद्धतीने बोलून पहा मग नक्की लक्ष्यात येईल की थोडा स्नेहाचा , मैत्रीचा , सहानुभूतीचा ओलावा मिळाला की माणसे वेगळी वागतात व मग जग सुंदर आहे हे नव्याने जाणवते . अर्थात आपण चिकाटी सोडता काम नये !



ऐकले ते पटले , वाचले ते मनात ठसले ! विवेकनिष्ठ भावोपचार 

एखाद्या व्यक्तीकडे , घटनेकडे अथवा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन तयार होण्यास प्रामुख्याने जवाबदार असलेल्या घटकांमध्ये ऐकीव अथवा वाचलेल्या माहितीचा देखील मोठा सहभाग असतो . अनेकदा ही वाचलेली अथवा ऐकलेली माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा करण्याचे कोणतेही परिणामकारक साधन उपलब्ध नसते तरीही आपण या माहितीवर आधारित असा आपला विशिष्ट दृष्टीकोन तयार करत असतो . यासाठी एक प्रयोग आपणास करता येईल , एखादी घटना घडतांना तेथे हजर असलेल्या चार प्रत्यक्षदर्शी व्यक्तीना जर आपण वेगवेगळे गाठून त्या घटनेबद्दल नेमके काय घडले ही माहिती विचारली तर प्रत्येक जण जे काही सांगेल त्यात आपणास अतिशयोक्ती , काल्पनिकता , किवा घटनेचा काही भाग विसरल्याने त्रोटकता , कच्चे दुवे आढळतील म्हणजेच मानवी स्वभावानुसार माहिती अधिक रंजक करण्यासाठी काही ठिकाणी तिखट मीठ लावून वर्णनकेले जाईल किवा काही भाग महत्वाचा न वाटल्याने गाळला जाईल. ती घटना घडत असताना पाहणारे जे चार जण असतील त्यांचे देखील विशिष्ट दृष्टीकोन असतात त्या घटनेकडे पाहण्याचे व त्या नुसारच त्या घटनेचे वर्णन केले जाईल . म्हणजेच एकंदरीत जे काही सांगितले जाईल त्यात १०० टक्के सत्य असेलच याची खात्री नसते अनेकदा वर्णन करण्यची पद्धत किवा वर्णन करणाऱ्याचे वाक् चातुर्य ही देखील यात परिणाम साधणारी जमेची बाजू असते . मात्र आपण अनेकदा अश्या ऐकीव माहितीच्या आधारे एखादी व्यक्ती , घटना , परस्थिती आणि जाती धर्माबद्दल आपले दृष्टीकोन बनवत असतो जे अविवेकी असू शकतात .लेखन हे मानवी विचार व भावना प्रकट करण्याचे एक प्रभावी साधन आहे यात दुमत नाही मात्र कोणत्याही विशिष्ट विचाराने अथवा भावनेने प्रेरित न होता तटस्थ पणे लिखाण करणे बहुधा शक्य होत नाही कारण लेखन करताना प्रत्येक लेखक देखील आपला विशिष्ट दृष्टीकोन वाचकांना पटावा अश्या पद्धतीने लिहीत असतो व त्यासाठी तो अनेक खरे खोटे पुरावे किवा दाखले देण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण लेखनामागची प्रेरणा व हेतू देखील साध्य व्हावा अशी त्याची इच्छा असते . सध्या छापील आहे म्हणजे खरेच असणार असा एक सर्व साधारण समज तयार झाला आहे त्यामुळे वर्तमान पत्र , मासिके , नियतकालिके , ऐतिहासिक वैगरे जे काही साहित्य निर्माण झाले आहे किवा होते आहे त्यातील छापलेले सर्व काही खरे असावे असा आपला समज अनेकदा व्यक्ती , प्रसंग , परिस्थिती याबाबतचे अविवेकी दृष्टीकोन तयार करीत असतो . या पूर्वीच्या लेखात प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाच्या , घटनेच्या , अथवा परिस्थितीच्या अनेक वेगवेगळ्या बाजू किवा कंगोरे असतात मात्र बहुधा आपण त्यापैकी एखादी विशिष्ट बाजू अनुभवतो किवा पडताळतो आणि त्याबद्दल आपले मत तयार करतो हे विवेकनिष्ठ नाही हे आपण पहिलेच आहे .तेव्हा ऐकले ते सगळे खरे , वाचले ते देखील सगळे खरे असा अविर्भाव न ठेवता त्याबाबत तटस्थपणे आपले दृष्टीकोन बनवता आले तर अधिक योग्य राहील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा