शनिवार, ६ एप्रिल, २०१३

मुलभूत तत्वे !

विवेकनिष्ट भावोपचार ... मुलभूत तत्वे !


विवेकनिष्ठ भावोपचार ही स्वतच्या विचारात ..भावनात ..दृष्टीकोनात  आणि पर्यायाने कृतीत बदल करण्याचे उपचार आहेत .. अल्बर्ट एलीस या मानस शास्त्रज्ञाने ही उपचार पद्धती विकसित केली आहे ..खरे अल्बर्ट एलीसच्या खूप आधी  गीतेत  श्रीकृष्णाने .. महात्मा गौतम बुद्धाने ..नंतर समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचा सखोल अभ्यास करून मनाच्या वेगवेगळ्या अवस्था .. मनाचे विद्रोह .. मनाची चंचलता .. मनाचे कठीण कंगोरे .. याबाबत माहिती दिली आहे .. अश्या मनाला सन्मार्गावर ठेवण्यासाठी उपाय सांगितले आहेत .. अल्बर्ट एलीस यांनी हेच सगळे मानसशास्त्रीय भाषेत सांगून जणू त्याला दुजोराच दिला आहे .
१) सर्वात आधी हे मान्य केले पाहिजे की मला जसा माझ्या इच्छे प्रमाणे सगळे घडावे व मी नेहमी सुखी राहावे असे वाटते तसेच माझ्या आसपासच्या सर्व जीवांना देखील तसेच वाटते त्यामुळे माझे सुख मिळवण्याच्या नादात मी कोणाला दुखः तर देत नाहीय ना ? कोणावर अन्याय तर करीत नाहीय ना या बाबत दक्ष राहणे .
२ ) विवेकनिष्ठ भावोपचार म्हणजे , वेळोवेळी स्वतच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना समजून घेत त्यांचे योग्य विश्लेषण करणे व त्यापैकी स्वतःला वा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या भावना मनातून काढून टाकणे.
३) एखाद्या घटनेच्या , एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाच्या , अथवा एखाद्या प्रसंगाच्या मला न जाणवलेल्या किवा न समजलेल्या अनेक बाजू असतात हे निखळ सत्य आहे तेव्हा या बाबतीत सर्व बाजूंचा विचार करून मग संबधित घटनेबाबत , व्यक्तीबाबत अथवा परिस्थिती बाबत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना तटस्थ पणे पाहून अविवेकी भावना दूर करणे .
४ ) कोणतही व्यक्ती १०० टक्के वाईट अथवा १०० टक्के चांगली नसते, तर माझ्या त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन त्या व्यक्तीला तसे ठरवीत असतो . प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या वाईट गोष्टींचे मिश्रण असते . फारच थोडे लोक जे अध्यात्म समजतात व आचरणात आणतात ते या पलीकडे जातात .
५) माझ्याशी संबधित लोकांनी नेहमी माझ्याशी चांगले वागावे , माझा मान ठेवावा , माझ्याशी गोड बोलावे , असे मला वाटते तसेच इतरांना देखील वाटत असते व त्याकडे मी दुर्लक्ष करता कामा  नये .
६) नेहमी आसपास घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांबाबत कोणतीही प्रतिक्रिया देताना भावनेच्या भरात न देता मी संतुलित राहून प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत हेच माझ्या समंजस पणाचे मोजमाप आहे .
७) निसर्गाने निर्माण केलेल्या जगात सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे व त्यांचा हा अधिकार हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही कारण मी सर्वश्रेष्ठ नाही हे मी कधीच विसरता कामा नये .
८) निर्मात्याने रचलेल्या या सुंदर जगात मी घाण करण्यासाठी नाही तर हे जग अधिक सुंदर करण्यासाठी जन्माला आलोय त्यामुळे जेथे जेथे शक्य होईल तेथे मी लोकांना मदत करण्याचा , आनंद देण्याचा व माझ्या परीने हे जग अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करीन . 
९) दया , क्षमा , शांती , स्नेह , करुणा , शील , ज्ञान , सद्सदविवेक हे अलंकार मानवी व्यक्तिमत्व अधिक सुंदर बनवतात हे सदैव ध्यानात ठेवेन .
१०) मृत्यू अटळ आहे हे न विसरता माझ्याकडे असलेल्या प्रत्येक क्षणाचा मी जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करेन हे माझ्या हाती आहे . विवेकनिष्ठ भावोपचार हा स्वतःवर स्वतःने करण्याचा उपचार आहे हे लक्षात ठेवत मी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याएवजी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे अधिक संयुक्तिक असते . 

बाकी पुढील भागात ............!

===========================================================================

दृष्टीकोन बदलण्याचे आव्हान -

कोणतीही व्यक्ती , घटना , परिस्थिती चांगली अथवा वाईट नसते तर आपला दृष्टीकोन त्याला तसे स्वरूप देतो हे जर नीट लक्षात घेतले गेले तर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भावनिक संतुलन टिकवून ठेवणे शक्य होते इतकेच नव्हे तर दैनंदिन जीवनात दृष्टीकोन बदलामुळे अनेक कठीण प्रसंगातून योग्य मार्ग काढता येऊ शकतो . अर्थात दृष्टीकोन बदलणे ही एक मोठी कसरत आहे कारण लहानपणापासून बनत गेलेले आपले दृष्टीकोन अंतर्मनात इतके खोल रुजलेले असतात की ते सहजासहजी बदलणे कठीण जाते , त्या साठी दृष्टीकोन बनतात कसे ते आधी पहावे लागेल .
१) संस्कार - जन्माला आलेल्या बाळाच्या मनाची पाटी अगदी कोरी असते पण नंतर त्याला एक माणूस बनवण्यासाठी पालक , गुरुजन व आसपास च्या संबंधित लोकांकडून जाणता - अजाणता वेगवेगळे संस्कार दिले जातात ज्याला आपण ' बाळकडू ' असेही संबोधतो यात धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक , नैतिक गोष्टींचाही समावेश असतो. अर्थात हे सारे संस्कार अगदी योग्यच असतात असे नाही कारण आजच्या विज्ञाननिष्ठ युगात अनेक धार्मिक संस्कार हे अंधश्रद्धा म्हणून ओळखले जातात तर काही संस्कार परिस्थिती नुसार कालबाह्य झालेत ..  काही संस्कार आसपासच्या वातावरणातून मनावर नकळत होत जातात..यात मित्र मैत्रिणींची संगत.. शाळा कॉलेजमधील वातावरण ..  घरातील तसेच आसपास च्या व्यक्तींचे वागणे, बोलणे देखील नकळत विशिष्ट संस्कार देण्याचे काम करतात व त्यातूनच एखाद्या व्यक्तीचा एकंदरीत जीवनविषयक दृष्टीकोन बनत जातो. अगदी घरात जे दैनिक वर्तमानपत्र नियमित वाचले जाते ते देखील एक विशिष्ट विचारसरणीचे असल्यास तो संस्कार नकळत मनावर बिंबवला जातो ..या पैकी अनेक संस्कार हे निरोगी मानसिकता बनविण्यास मदत करतात तर काही संस्कार अगदी विपरीत असतात जे आसपासच्या व्यक्ती व घटनांकडे बघण्याचा अविवेकी दृष्टीकोन तयार करत असतात . विवेकाचा वापर करून वेळोवेळी आपला दृष्टीकोन निकोप व मानवतेवर आधारित कसा ठेवता येईल हे पाहणे गरजेचे आहे कारण आपण पूर्वीच पहिले आहे जगात जसा मला सुखाने समाधानाने जगण्याचा अधिकार आहे असे मला वाटते तसाच अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि प्रत्येक वेळी मी माझ्या मर्जीने जगताना इतरांच्या हितास बाधा तर पोचवत नाहीय ना याचा विचार झाला पाहिजे .

==========================================================================


मी व माझ्या इच्छा ! 


१) माझ्या आयुष्यात सर्व काही नेहमी माझ्या इच्छे प्रमाणे घडावे असा माझा आग्रह असतो .
२) सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी माझ्या इच्छांचा पाठपुरावा करीत राहतो व रात्री झोपतानाही उद्याच्या इच्छा कशा पूर्ण होतील ही चिंता व आज पूर्ण न झालेल्या इच्छांबाबत खेद व्यक्त करीत , कोणाला तरी दुषणे देत मी झोपी जातो.
३)माझ्या इच्छांच्या आड येणारे लोक मला अजिबात आवडत नाहीत मग ते कोणीही असोत मी त्यांच्यावर मनोमनी चरफडत राहतो तर अनेकदा ही माणसे माझ्या जीवनातून नाहीशी व्हावीत असे मला वाटते .
४) माझ्या इच्छा माझ्या भल्याच्या आहेत किवा नाहीत याची परवा न करता मी इच्छापूर्तीसाठी झटत राहतो .
५)अनेकदा माझ्या इच्छा माझे भावनिक संतुलन बिघडवण्यास कारणीभूत असतात मात्र मला हे मान्य करणे कठीण जाते .
६) माझ्या इच्छा आणि इतरांच्या इच्छा या मध्ये होणारा संघर्ष माझे आणि कुटुंबियांचे देखील मनस्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत असतो .
७) नैसर्गिक , कौटुंबिक , सामाजिक आणि नैतिक बंधनांच्या चौकटी मला जाचक वाटत कारण त्या चौकटी मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू देण्याच्या आड येतात .
८) माझ्या इच्छांच्या विरुद्ध परिस्थिती असेल तेव्हा मी बंडखोरी करतो व बहुधा ही बंडखोरी माझ्या साठी घातक ठरते हे माहिती असूनही मी या वेळी तसे घडणार नाही या विश्वासाने बंडखोरी करतो .
९)माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाही तेव्हा मी निराशा , वैफल्य , संताप , भीती..दुख: या भावनांनी ग्रासला जातो व कधी कधी हे जीवन नकोसे होते .
१०) माझ्या इच्छेप्रमाणे जगणे ह माझा जन्मसिद्ध हक्क आहे या थाटात जगणे मला आवडते मात्र मी त्या मुळे अनेकांच्या इच्छांचा अनादर करतो आहे व त्यांचे जगणे कठीण करतोय याची मला जाणीवही नसते .
हे कितपत योग्य आहे ? मी आनंदी ,सुखी , प्रसन्न व समाधानी कसा राहू शकेन ?

1 टिप्पणी:

  1. आभार सर सुंदर सुगम्य विवेचन । मला अल्बर्ट एलिस ची पुस्तके अमरावतीत कोठे मिळू शकतील? प्लिज सांगाल मो 9623331192

    उत्तर द्याहटवा