शनिवार, ६ एप्रिल, २०१३

विवेकनिष्ठ भावोपचार - भावनांचा चक्रव्यूह


वर्तमानपत्र उघडले की बहुतेक बातम्या या भ्रष्टाचार , गुन्हेगारी , राजकीय कोलांट्या उडया , आंदोलने , अन्याय तर दोनचार बातम्या उदघाटन , सत्कार , खेळातील विजय ,पराभव याबाबत आणि मग सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा , चिंता व्यक्त करणारा अथवा कोणालातरी कानपिचक्या देणारा अग्रलेख असतो .दूरदर्शन वाहिनीच्या बातम्यात असलाच प्रकार व मध्ये मध्ये एखाद्या विषयावर ' बाल की खाल ' काढणारी निरर्थक चर्चा .... काथ्याकुट . निरनिरळ्या दूरदर्शन मालिकांमध्ये संघर्ष , सूड , विवाहबाह्य संबंध , सत्तास्पर्धा , कुटील डावपेच .रोजच्या व्यवहारात देखील मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना , जवळच्या व्यक्तींचे अगदी प्रेमाचे तर कधी कधी त्रासदायक वाटणारे अनाकलनीय वर्तन , संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे खास स्वभावविशेष आणि त्या नुसार होणारे त्यांचे वर्तन . या सर्वांबाबत मनात उमटणाऱ्या प्रतीक्रिया , स्वतच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी असणारा संघर्ष , आनंदाचे , चिंतेचे , दुखःचे , पराभवाचे , स्वप्नांचे क्षण . सर्व परिस्थितीशी जुळवून घेत जगणे , हसतमुख राहणे , आणि पुन्हा पुन्हा नव्या आव्हानासाठी तयार असणे हेच जीवन आहे .मात्र सर्वांनाच जीवनाशी आपला स्वर जुळवून घेणे जमत नाही आणि मग मनाची तगमग , चीडचीड , असुरक्षितता , अनामिक भीती , निराशा , वैफल्य , राग या प्रकारच्या भावना मनात वारंवार येतात . कोणाला माझी पर्वा नाही , माझी काही किंमत नाही , आपणच का जुळवून घ्यायचे , सर्वांसाठी मी मरमर करायची ..इतरांनी मजा मारायची ... माझे नशीबच फुटके , अशा जगण्याला काय अर्थ आहे ..मी पण जशास तसे वागले पाहिजे .. वैगरे स्वगत मनात सुरु होते .



स्वतच्या कल्पनेतील चारदोन सुखाचे क्षण जगण्यासाठी बंडखोरीचा निर्धार केला जातो ... तर कधी कधी 'स्व ' ला जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाते आणि त्यामुळे मूळ समस्या वाढते ..किवा सगळे सोडून कुठेतरी निघून जावे हा विचार मनात जोर धरतो ...काहीजण मग दिशाहीन वाटचाल करू लागतात, काही नेमकी चुकीची दिशा धरून चालत राहतात तर काही हेच ओझे कायमचे वागवण्याचा निर्धार जपत ओठ शिवून , हुंदके लपवतात .सर्व प्रकारच्या परिस्थितीत शांत राहून सुरळीत जीवन जगणे एकंदरीतच कठीण होत चालले आहे . भावनांच्या चक्रव्युहातून वाट काढणे सोपे नाही मात्र अशक्यही नाही .आवश्यक आहे ते आधी स्वतःच्या भावना ओळखणे ..त्या समजून घेणे .. त्यांचा आहे तसा स्वीकार करून मग त्यातील अविवेकी भावना बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ..हे नक्कीच मनशांती च्या दिशेने उचललेले विवेकी पाउल ठरेल ...



निसर्गाने मानवाला प्रदान केलेली कुशाग्र बुद्धी हे एक मोठे वरदान आहे माणसासाठी व त्या जोरावरच मानव इतकी प्रगती करत आहे परंतु बुद्धीच्या वापरा मागे भावनांची प्रेरणा असते मानव सोडून इतर प्राण्यांच्या आहार , निद्रा , भयं आणि मैथुन या चार नैसर्गिक प्रेरणा मानल्या जातात व प्राणी या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाहीत किंबहुना त्यांची बुद्धी तितकीच मर्यादित ठेवली आहे परंतु मानव हा प्राणी मात्र इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण या चार नैसर्गिक प्रेरणांच्या खेरीज काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या मूळ विचारांमुळे . खरे तर यांना अध्यात्माने विकार असे संबोधले आहे कारण बहुधा प्रत्येक मानव काम, क्रोध , लोभ , मद , मोह, मत्सर यांचा अतिरिक्त वापर करून स्वत:चे भावनिक सुख मिळण्याच्या अतिरेकी प्रयत्नात स्वतःचे आणि स्वतासोबत इतरांचे देखील जिवन अधिक कष्टप्रद करत जातात . आपल्याला आसपासचा प्रत्येक मानव आनंद , सुख , समाधान , शांती आणि पर्यायाने सार्थकता मिळवण्यासाठी झटताना दिसतो व आनंद , दुखः , शांती , आणि सार्थकतेच्या प्रत्येकाच्या कल्पना मात्र वेगवेगळ्या असतात असेही आढळते ....आणि या कल्पना जर अविवेकी असतील तर ? विवेक म्हणजे नक्की काय ? मानस शास्त्रानुसार विवेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून जात असताना देखील स्वतःला आणि स्वताशी संबधित इतर लोकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेणारा विचार असे म्हणता येईल .प्रत्येक व्यक्तीने ' जगा आणि जगु द्या ' हे प्रमुख तत्व लक्ष्यात ठेवून विचार करत गेले तर विवेक जागवणे कठीण नाही .... जन्मापासून ते मृत्यू पर्यंत प्रत्येक मानवापुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात शारीरिक .. मानसिक ,कौटुंबिक .. सामाजिक व अध्यात्मिक या सर्व बाजूनी या समस्या येत असतात . काही समस्या निसर्गनिर्मित असतात .. काही आसपासच्या एखाद्या मानवाने निर्माण केलेल्या असतात तर काही समस्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी निगडीत असतात . अश्यावेळी समस्यातून मार्ग काढताना अनेक प्रकारच्या भावनिक आंदोलनांचा सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो व सरते शेवटी स्वतःला कमीत कमी त्रास कसा होईल किवा आनंद कसा मिळेल असा मार्ग काढण्याकडे प्रत्येकाचा कल असतो अश्या वेळी विवेक पूर्ण विचार हा बहुधा अधिक समाधान कारक मार्ग काढण्यासाठी मदत करीत असतो . बहुधा सगळे जण आपले सुख ..आनंद ..समाधान ..शांती हे बाह्य जगातील घटना ..व्यक्ती परिस्थिती यावर अवलंबून आहेत असे समजतात ..खरे तर कोणतीही अविवेकी अथवा विवेकी भावना नी अंतर्मनातून निर्माण होत असते .. कदाचित ती भावना निर्माण होण्यामागे एखादी घटना ..व्यक्ती ..परिस्थिती निमित्तमात्र असू शकते .. परंतु आपल्या भावनिक असंतुलनासाठी आपण इतरांना जवाबदार धरणे सोडून स्वतच्या विचारात..भावनांत आवश्यक बदल करू शकलो तर नक्कीच आपला फायदा असतो .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा